ParatVari परतवारी
Share:

Listens: 99

About

आजी, म्हणजे माझ्या आईची आई दरवर्षी पायी वारीला जायची. वर्षानुर्षे. लहानपणी ती वारीहून आली की आई आम्हाला तिच्या पायावर घालायला घेऊन जायची. वाड्यातले, नात्यातले बरेच यायचे तिच्या पाया पडायला. वारीला जाऊन आलेल्या माणसाचं वय बघायचं नसतं. त्यामुळे तीच्याहून मोठया वयाचे सुद्धा तिला वाकून नमस्कार करायचे. तिला तिच्या विठुरायाचं फार होतं. भक्ती कशी करावी याचं ती मूर्तीमंत उदाहरण होती. पांडुरंगाचं आणि अक्कलकोट स्वामींचं खूप होतं तिला. आमच्या घरीही स्वामींचं खूप. आजीचं आणि बाबांचं गुरुस्थान एकच त्यामुळे व्यावहारिक जगात सासू आणि जावयाचं नातं असलं तरी अध्यात्मिक पातळीवर ते एकमेकांचे गुरुबंधू आणि गुरुभगिनी होते. मी तसा फारसा देवधर्मात कधीच नाही. उलट बंडखोर प्रवृत्तीच! सळसळत्या रक्तामुळे चेष्टा, कधी क्वचित कुचेष्टाही केली असेल. एकदा म्हणाली पंढरपूर जवळ आल्यावर भक्त भेटीस येणार म्हणून आनंदाने पांडुरंगाच्या देवळाचा कळस देखील डोलू लागतो. खुप हसलो आम्ही फिदीफिदी. आईने शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाली कळसाच्या दर्शनाने भक्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात त्यामुळे दृष्टीभ्रम होऊन कळस हलत असल्याचा भास होत असावा. कुणाच्या श्रद्धेची अशी चेष्टा करु नये. पुढे नोकरीला लागल्यावर एकदा फर्ग्युसन कॉलेज रोडवर ज्ञानेश्वर पादुका चैकापाशी वारीमुळे ट्रॅफिक जॅम लागला. मनात चरफडलो देखील. परंतु भक्तीचा तो अलोट प्रसंग पाहता, टाळ मृदुंगाच्या नादात नामस्मरणात तल्लीन झालेले ते भक्त पाहता नकळत डोळ्यांतून घळाघळा अश्रुधारा वाहू लागल्या. आपोआप हात जोडले गेले. आणि कळस हलण्याच्या प्रसंगाची आठवण झाली. वर म्हटलं त्याप्रमाणे मला देवाधर्माचं फारसं काही नाही. आजी आणि मोठी मामी, म्हणजे आजीची मोठी सून या दोघी सोडल्या तर आम्हा कुणालाच त्याचं फार काही नाही. तिची थोरली मुलगी तर नास्तिक! आणि तिच्याकडे म्हणजे आजोळी राहून शिकलेली आमच्यासारखी नातवंडंही एकतर नास्तिक किंवा सेमी-नास्तिक (LOL). आजोबा देवाधर्मापासून अगदीच अलिप्त पण ही मात्र सगळे सणवार, व्रत वैकल्यं, उपासतापास उत्साहाने आणि मनापासून करत असे. पण तिने कधीही ते दुसऱ्यावर लादलं नाही. चुकूनही नाही आणि आम्हीही कधी तिच्या आड आलो नाही. ती रागेही भरली असेल पण कधी द्वेष नाही केला. कुणीच कुणाचाच. मुलंबाळं संसार नसल्यामुळे मी काही म्हणजे काही करत नाही. गुढ्या नाहीत की तोरणं नाहीत. कुणासाठी करायचं? माझ्याकडे तर देवघरही नाही त्यामुळे आषाढी एकादशी काय आणि संकष्टी काय सगळे दिवस सारखेच. तशातच काल स्वयंपाक करणारी योगिता म्हणाली संध्याकाळी बाहेर पडाल तर मटण घेऊन या. उद्या करते. फेसबुकवर वारीच्या पोस्ट्स, फोटोज बघण्यात येत होते ते आठववून तिला म्हणालो आषाढी एकादशी कधी आहे? तशी म्हणाली उद्याच. एका सेकंदाचाही विचार न करता तिला म्हणालो मग उद्या मटण नको करायला. परवा करू. उपास जरी केला नसला तरी मुद्दाम यादिवशी मांसाहार नको. तो टाळू असा विचार आला. खोल कुठेतरी झिरपलेलं असतं ते असं वर येतं. संस्कार संस्कार म्हणजे दुसरं काय? असो. तर आजीचं पाहून तिची दोन नंबरची मुलगी म्हणजे माझी मावशी सुद्धा वारीला जाऊ लागली. तिच्या वारीच्या आणि खासकरून परतवारीच्या अनुभवांविषयी माझ्या ऑस्ट्रेलियातल्या मावशीने तिच्या गृपसाठी मुलाखत ठेवली होती. काही महिन्यांपूर्वी झूमवर ही मुलाखत सिडनीतील ज्ञानेश्वरी अभ्यासवर्गाच्या मर्यादित श्रोत्यांसमोर झाली पण ती इतकी सुश्राव्य आणि आनंददायक आहे की हा अनुभव अनेकजणांपर्यन्त पोचावा असं मला वाटलं. म्हणून मावशीच्या परवानगीने ही मुलखात मी पॉडकास्टच्या स्वरूपात इथे देत आहे. आपण नक्की ऐका आणि आपला अभिप्राय कॉमेंट सेक्शनमधे द्या.